शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.
शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.
शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?
एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य
शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.
शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, फॅक्स, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अशक्य कार्य शक्य केले.
शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.
शिवाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत, कारण ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्मयगड जिंकले पाहिजेत.
Thursday, 18 February 2010
Tuesday, 5 December 2006
छत्रपती शिवाजी महाराज

ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला, पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला........... ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। हे दुर्दैव म्हणव लागेल कि, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यापासून, दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्याच्या घोड्याच्या टापा गेल्या त्या शिवबाचे वारस आपण पण आज किती जनांना महाराजांचा इतिहास माहित आहे............ अगदी कमी........... ज्यांनी अख्ख आयुष्य या मातीसाठी बहाल केल, वयाच्या अगदी १६ व्या वर्षापासून ५० पर्यंत फक्त स्वराज्य आणि स्वराज्य हाच विचार केला............ २२ हजारांची फौज घेवून आलेला अफझल खान, ३२ हजार फौझ घेवून आलेला सिद्धी जोहर, ६० हजारच्या आसपास फौज घेवून उतरलेला शाहिस्तेखान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. या सगळ्यावर मात केली....... एक हिंदू राजा पण औरंग्याचा चाकर मिर्झा राजा १ लाख फौज घेवून उतरला, पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला............ राजे आग्र्यामध्ये कैद असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला, बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ??? महाराजांकडून.............. हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...........कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं. महाराजाविषयी थोडेशे.............अधिकारकाळ- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक- जून ६, १६७४
राज्यव्याप्ती- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी- रायगड
पूर्ण नाव- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या- गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म- फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू- एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी- छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील- शहाजीराजे भोसले
आई- जिजाबाई
पत्नी- सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती- छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे- भोसले
राजब्रीदवाक्य-'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत. शिवकल्याण राजा।। निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला ।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.
शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???
त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.
पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...
शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.
शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.
भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.
खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!
"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.
२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???
अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे.
आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७१ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.
हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन. ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदहारण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.
भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात.
स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला. स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून हे 'श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो.
.... वंदे शिवराय .... !!!
"पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल, पण लयलूट करायची ती फ़क्त सुगंधाचिच"..
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Subscribe to:
Posts (Atom)